Skip to main content

त्यांच्या खाजगी आय़ुष्यात डोकावणारे तुम्ही कोण ?



दुसऱयांच्या घरात काय सुरु आहे, हे जाणून घेण्यात अधिक रस असलेल्या माणसांना वन्यप्राण्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याची चटक लागली आहे. लहानसा नाकतोडा असो, सरडा, पक्षी अगदी वाघ, सिंह, मगर, गेंडा सगळ्यांच्या मिलनाचे ( प्रचलित शब्द – रोमान्स) फोटो काढण्याची स्पर्धेने सध्या सर्व संकेतांच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. सोशल मीडियावर स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी वन्यजीवांच्या मिलनाचे फोटों बाजार सुरु आहे. वन्यप्राण्यांच्या आयुष्यातील अतिशय खाजगी अशी ही घटना चव्हाट्यावर आणण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिलाय.
...

काही वर्षांपूर्वी फॅन थ्रोटेड लिझार्ड (Fan Throated Lizard) या सरड्याचे फोटो काढण्याचे पेव आले. बंदुकीसारख्या मोठमोठ्या लेन्सचे कॅमेरे घेऊन आलेल्या या अतिउत्साही छायाचित्रकारांनी या सरड्याचा मिलन काळ चव्हाट्यावर आणला.
एरवी हा सरडा शेजारून गेला तरी त्याच्याकडे डुंकूनही न बघणारे छायाचित्रकार जेव्हा तो सरडा माजावर येतो, तेव्हा त्याला सब्जेक्ट समजतात. मादीला आकर्षिक करण्यासाठी धडपडणाऱया या सरड्याला चोहोबाजूने घेरतात. त्याच्या गळ्याखालचा सप्तरंगी पडद्याचा फोटो टिपण्यासाठी सरडा सकाळी उडल्यापासून संध्याकाळी बिळात जाईपर्यंत लोक अक्षरशः हात धुवून त्याच्या मागे लागतात.




निसर्गाने सरड्याला अवघ्या वर्षाचे आयुष्य दिलय. त्यात फक्त दोन महिने मिलनाचा हंगाम असतो. अनेक नर सरड्यांबरोबर स्पर्धा असते. आकाशातून शिकारी पक्ष्यांचा वॉच असतो, एवढ्याशा जिवासमोर अनेक आव्हाने असताना, त्याच्या आयुष्यातील सर्वात सुखद काळ.. आपण हिरावून घेणे योग्य आह का ?

फॅन थ्रोटेड लिझार्ड हे निमित्त मात्र. अलीकडे बहुतांश प्राण्यांच्या बाबतीत हेच घडतय. कर्नाळा पक्षी अभायरण्यात येणाऱया तिबोटी खंड्याचे ( Oriental Dwarf Kingfisher)
फोटो टिपण्यासाठी काही वर्षांपूर्वी छायाचित्रकारांनी असाच उच्छाद मांडला होता, अखेरीस वन विभागाला तो पक्षी राहत असलेल्या भागात फोटोग्राफरवर बंदी आणण्याची वेळ आली. हिच परिस्थिती सध्या अमूर फाल्कन (Amur Falcon)अनुभवतो आहे. जगातील लांब पल्ल्याचे आणि सर्वाधिक जास्त काळ स्थलांतर करणाऱया अमूर फाल्कनचं एक कुटुंबाला काय दुर्बद्धी सुचली आणि त्यांनी लोणावळ्यातील एका माळरानावर काही दिवसांसाठी विसावा घेतला.
अमूर फाल्कन आल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱया सारखी पसरली अन् बघता बघता आठवडाभरात शेकडो फोटोग्राफर या पक्ष्यांचे फोटो तथाकथित युनिक फोटो टिपण्यासाठी दाखल झाले. एवढासा तो जीव छायाचित्रकारांच्या जत्रेमुळे घाबरला नसेल तरच नवल. छायाचित्रकाराबंददल अनेक तक्रारी गेल्याने शेवटी वन विभागाने दोन दिवसांपूर्वी लोणावळा परिसरात अमूर फालक्न असलेल्या भागात छायाचित्रकारांवर बंदी आणली आहे.






पावसाळ्यातील बेडकांचे मिलनाचे फोटो देखील छायाचित्रकारांसाठी हॉट विषय ठरतो. मध्यरात्री जंगलात गर्दी करुन लोक बेडकांना शोधून त्यांचे खाजगी फोटो टिपतात. मिलनापुरते आयुष्य जगणाऱया काजव्यांसाठी वळवाचा पाऊस ते मान्सून हा महत्वाचा हंगाम असतो. या काळात हजारो काजवे रात्री वेगवेगळ्या झाडांवर लयबद्ध विहार करतात. त्यावेळी त्यांचे मिलन होते आणि नर काजव्यांचे आयुष्य संपते. काजव्यांच्या मिलनाचे फोटो टिपण्यासाठी अलीकडे छायाचित्रकारांची धपडप सुरु आहे.
एवढंच काय वाघ, बिबट्या, सिंह, गेंडा, हत्तीचे मिलनाचे व्हिडिओ, फोटो टिपून त्यांचे फोटो युद्ध जिंकल्याच्या आवेशात पोस्ट केले जातात. वेगवेगळ्या अघोरी क्लुप्त्या लढवून छायाचित्रकार सध्या वन्यप्राण्यांच्या जीवावर उठले आहेत. चांगले फोटो मिळविण्यासाठी फोटोग्राफरमध्ये भांडणे आणि मारामाऱ्याही होत आहेत.

संशोधनासाठी फोटोग्राफी समजू शकतो

वन्यप्राण्यांचे संशोधन, सविस्तर अभ्यास किंवा डॉक्युमेंटेशनसाठी पुरावे गोळा करणे, छायाचित्रे काढणे आवश्यकच आहे, त्याबद्दल कोणाचेच दुमत असणार नाही. बर एखाद्या हौशी फोटोग्राफरला सहज जाता जाता काही युनिक क्षण टिपण्याची संधी मिळाली तर आपण समजू शकतो, पण सोशल मीडियावर लाइक्स मिळिण्यासाठी फोटो पोस्ट करण्याची गरज काय?

आपली हौस या छोट्या जीवांसाठी त्रासदायक ठरते आहे, याची जाणीव नसणे हे निंदनीय आहे. कॅमेऱयाचा वापर किती आणि कसा करावा, याचे भान आपल्याला असलेच पाहिजे.
शहरात कोणी लपून कोणी फोटो काढला, मॉलमध्ये बसवलेले छुपे कॅमेरा याबद्दल आपण किती आक्रमक होतो. गुन्हेगाराला जबर शिक्षा मिळते. मग वन्यप्राण्यांच्या खाजगी आयुष्यातील क्षण त्यांच्या परवानगीशिवाय सोशल मीडियाच्या बाजारात मांडण्याचा अधिकार छायाचित्रकारांना कोणी दिलाय..? प्रत्येक वेळी नियमांची चौकट घातल्यावरच शहाणपण येणार आहे का?

चैत्राली चांदोरकर, पुणे


Comments

  1. कोणाच्याही खाजगी आयुष्यात डोकावण्याचा कोणाला नैतिक आधार नाही. अर्थात लोकांना हे पटत नाही.
    कारण सोपे आहे.
    एक तर स्वताकडे लक्ष द्यायचं नाही.
    तसेच आपल्या भारत देशात याबाबत अनेक दाखले, पुरावे, सिद्धांत, आणि उदाहरणे आहेत त्याचा आभ्यास करायचा नाही. त्याचे पालन करायचे नाही.
    सतत दुसरे काय करतात, दुसरे काय बोलतात, दुसरे काय खातात, दुसरे काय घालतात, दुसरे नवीन प्रजा कशी घडवतात, याचा विचार करायचा. ते बघायचं आणि त्यावर विचार करायचा.
    तसेच,
    १. कर्माचा सिद्धांत वाचायचा नाही आणि आचरणात आणायचा नाही.
    २. भौतिक शास्त्र वाचायचं नाही आणि आचरणात आणायचं नाही.
    ३. रसायन शास्त्र याचा आभ्यास नाही करायचा आणि आचरणात आणायचं नाही.
    ४. भारतात राहून भागवत गीता वाचायची नाही आणि त्याचे आचरण करायचं नाही.
    ५. पंचमहाभूते यांचा आभ्यास करून, आणि संशोधन करून त्यांच्या सारख वागायचं नाही.
    ६. रामायण आणि महाभारत ही गोष्ट म्हणून आणि मनोरंजन म्हणून वाचायची. त्यातून काहीही शिकायचं नाही.
    आता एवढे ६ सिद्धांत, पुरावे, दाखले, आणि उदाहरणे आपल्या सर्व भारतीय (१३० कोटी किंवा जास्त) यांच्या समोर ५००० वर्षा पेक्षा जास्त आहेत. मी ही त्यात आलोच. मी वर नमूद केलेले ६ दाखले यांचा वेगवेगळ्या कोनातून स्वतासाठी आणि स्वताच्या विकासासाठी आभ्यास केला. त्यावर संशोधन केले.
    त्यामुळेच मी स्वता कोणाच्याही खाजगी आयुष्यात (यात माझे पालक आले. बायको आली. मुले आली. नातेवाईक आले. मित्र आणि मैत्रीण सुद्धा.) आजपर्यंत कधीही डोकावून बघितल नाही, बघत नाही आणि बघणार नाही.
    अर्थात हे माझे मत आहे. माझे मत हे वर नमूद केलेले ६ दाखले यांच्या आभ्यासावर आधारित आहेत. माझे मत हे भारतीय मत आणि जागतिक मत नाही (होणार नाही) याची मला पूर्ण जाणीव आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अनुभवा वाघांच्या पलीकडचे जंगल रंग बदलणारे सरडे, सरपटणारे प्राणी, वैविध्यपूर्ण रंग आणि मधुर शीळ घालून आकर्षित करणारे पक्षी, फुलपाखरे, आपली नजर चुकवून सभोवताली फिरणारे गवताळ प्रदेशातील प्राणी अन् आकर्षक फुलांनी बहरलेले डेरेदार वृक्ष बघण्यातही एक वेगळी मजा आहे. वाघांचे अस्तित्व नसलेल्या अभयारण्यांकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला आहे. पुणे विभागातील मयुरेश्वर चिंकारा अभयारण्य, रेहेकुरी काळवीट अभयारण्य, भीमाशंकर शेकरू अभयारण्य आणि करमाळा-नान्नज माळढोक अभयारण्य आता वेगळ्या रूपात पर्यटकांसमोर येणार आहे. ................... चैत्राली चांदोरकर .....................  रोजच्या धकाधकीच्या जीवनचक्रातून रिफ्रेश होण्यासाठी सुट्टीच्या दिवशी निसर्गरम्य, शांत ठिकाणी फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढते आहे; पण वाढत्या संख्येमुळे या निसर्गरम्य स्थळांनाही जत्रेचे स्वरूप आल्याचे दिसते. मोठमोठी हॉटेल्स, गेमिंग झोन, शहरी वस्तूंनी फुललेल्या बाजारपेठा अन् वाहतुकीची कोंडी.... हेच चित्र एखाद्या हिलस्टेशनवर अनुभवायला मिळत...
आता स्थलांतर वाघांचे   ..................................... व्याघ्र संवर्धनाची दिशा निश्चित करण्यासाठी ‘वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर’ आणि ‘ग्लोबल टायगर फोरम’तर्फे व्याघ्र संवर्धनाची पुढची दिशा ठरविण्यासाठी आशियातील विविध देशांच्या मंत्र्यांची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेदरम्यान वाघांची संख्या अत्यल्प असलेल्या देशांमध्ये वाघांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे भारतातील काही वाघांचे लवकरच कंबोडियात स्थलांतर होणार आहे.   जंगलातील अतिशय देखणा, रुबाबदार आणि राजबिंडा प्राणी असलेल्या वाघाला वाचविण्यासाठी सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जगात शंभर वर्षांपूर्वी तब्बल एक लाख वाघ जंगलात वास्तव्यास होते. घरातील अनेक बुजूर्ग मंडळींनी वाघांचा हा घटता आलेख अनुभवला आहे. राजामहाराजांच्या काळात, अगदी ब्रिटिशांची राजवट संपल्यानंतरही काही वर्षे वाघांना मारण्यासाठी सरकारकडून बक्षीस जाहीर केले जात असे. या काळात बदुंकांच्या साह्याने शिकार करणे सोपे झाल्याने झपाट्...
किल्ल्यांसाठी हवाय ‘होमवर्क’ छत्रपती शिवाजी महाराजांनी साकारलेल्या सह्याद्रीतील किल्ल्यांप्रती असलेली दुर्गप्रेमींमध्ये संवेदनशीलता आणि तळमळीला युनेस्कोचे पदाधिकारी हुरळून जाणार नाहीत. त्यांच्या निकषांमध्ये उतरण्यासाठी किल्ल्यांचे शास्त्रीय पद्धतीने केलेले 'डॉक्युमेंटेशन' दाखविण्याची गरज आहे. जागतिक वारसा स्थळाच्या स्पर्धेतील मानांकन मिळविण्यासाठी आपल्याला किल्ल्यांचा प्रचंड 'होमवर्क' करावा लागणार आहे.... जैववैविध्याने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटातील ३९ स्थळांना युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट समितीने तीन वर्षांपूर्वी हिरवा कंदिल दाखवला. रशियातील सेंट पिट्सबर्गमध्ये झालेल्या त्या बैठकीत पश्चिम घाटाच्या प्रस्तावाचे महत्त्व पटवून देताना भारताच्या प्रतिनिधींना खूप मेहनत घेतली होती. हा अहवाल अंतिम टप्प्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पश्चिम घाटाने चार वर्षांचा खडतर प्रवास अनुभवला. जागतिक व्यासपीठावरील तज्ज्ञांच्या मनात या घाटाविषयी कुतूहल निर्माण करीत असतानाच तेथील नैसर्गिक संपत्तीचे शास्त्रीय महत्त्व बिंबविण्याची प्रक्रिया भारतीय प्रतिनिधींसाठी मौल्यवान अ...