तिल्लारीच जंगल - सिंधुदुर्गातील अमेझॉन
आठवडाभर गोव्यामध्ये धुव्वा केल्यानंतर येताना आंबोलीत मुक्काम करण्याचा विचार होता. पण वेगळे काही तरी बघावे म्हणून
Anish Pardeshi
Kaka Bhise
दोघांनीही वानोशीचा पर्याय सुचवला.सिंधुदुर्ग म्हटल्यावर तारकर्ली, वेंगुर्लासह इतर समुद्र किनारे असतानाही आम्ही दोडामार्गमधील तिल्लारी जंगलात जायचं ठरवलं. तिल्लारी, वानोशी, दोडामार्ग ही नाव तशी अनेकांसाठी अपरिचित आहेत. पण आवर्जून सांगते तुम्हाला नवीन, हटके काही बघायचं असेल तर वानोशीला भेट दिलीच पाहिजे.
प्रवीण देसाई या तरुणामुळे गेल्या काही वर्षात कुडासे गावातील वानोशी हे नाव चर्चेत आलयं. उच्चशिक्षण पूर्ण झाल्यावर पुणे किंवा मुंबईत जाऊन नोकरी करणे सहज शक्य असतानाही, प्रवीणने गावताच राहण्याचा निर्णय घेतला. नावाच्या अर्थाप्रमाणेच वानोशी हे वनाच्या कुशीतील गाव म्हणता येईल. दोडामार्गमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रवीणने पहिला वहिला होम स्टे सुरु केला आहे. टापटिप, हवेशीर अशा या होमस्टेमध्ये जेवणही स्थानिक पद्धतीचे मिळते.
प्रवीण स्वतः उत्साही असल्याने आम्ही पोहोचल्यावर त्याने आपण काय काय बघू शकतोय याची यादी सुरु केली. आमचं जंगल किती युनिक आहे, इथले प्राणी, पक्षी, नदी, दुर्मिळ झाडे, देवरायांबद्दल तो भरभरून बोलत होता. होम स्टे जवळ त्याने मचाण बांधले आहे. त्यावर बसून आम्ही रात्री गव्यांची वाट पाहिली. पण आज गव्यांच दर्शन दुर्लभ आहे लक्षात आल्यावर तो आम्हाला रात्री जंगलात फिरायला घेऊन गेला. रात्रीच्या वेळी एखाद्या देवराईत फिरण्याचा आमचा पहिलाच अनुभव होता. प्रवीणबरोबर रंगलेल्या गप्पा, बलाढ्य अशा झाडांखाली उभे राहून तो देत असलेली माहिती, गावातील किस्से, जंगलाची वैशिष्ट्ये ऐकताना मजा आली.
दुसऱया दिवशी प्रवीणचा मित्र विशाल सकाळी सात वाजताच दुर्बिण घेऊन हजर होता. तिल्लारी नदीपासून सुरु झालेला आमचा जंगल ट्रेक पुढे तळकट अभयारण्यामध्ये संपला. दोडामार्ग परिसर म्हणजे जणू पक्ष्यांचे नंदनवन आहे. ग्रेट हॉर्नबिल, मलबार हॉर्नबील, पाईड हॉर्नबील, विविध प्रकारचे फ्लायकॅचर्स, हळद्या, सुतारपक्षी, तांबटसह अनेक प्रकारचे पक्षी, शेकरु बघायला मिळाले. (कॅमेरा घरी राहिल्याने फोटो काढता आले नाहीत
. डोळ्यांनी मनसोक्त बघण्याचा आनंद घेतला )

दोडामार्गमधील जंगल पिंजून काढायचे असेल तर महिनासुद्धा कमी पडेल, एवढे विस्तीर्ण असल्याचे जाणवले. पर्यटकांच्या नकाशापासून अद्याप दूर असल्यामुळे या भागात मोजकेच लोक येतात. जंगल भ्रमंतीची आवड असलेल्या लोकांचे प्रमाण अर्थातच जास्त असते.
वनसंवर्धन आणि पर्यटनातून लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, असं प्रवीणला वाटतं, त्यामुळेच त्याने गावात राहण्याचा निर्णय घेतला. इथे येणाऱया प्रत्येकाकडून त्याचे कौतूक होते आहे. त्याच्या कामाला प्रोत्साहन मिळते आहे.

( काळी किनार)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग हा तालुका गोव्याच्या जवळचा. हा तालुका पश्चिम घाटाच्या कुशीत वसला आहे. आजही येथील अनेक लोक नोकरी गोव्यात करतात. महिन्याचे सामान, इतर खरेदी देखील त्यांची गोव्यातूनच होते. गोव्या एवढाच दोडामार्ग निसर्गसंपन्न प्रदेश आहे. येथील खनिज संपत्तीमुळे केवळ गोव्यातील नव्हे तर इतर राज्यातील उद्योजकही दोडामार्गमधील तिल्लारीच्या वनक्षेत्रावर नजर ठेवून आहेत. गेल्या काही वर्षात केरळमधील रबर उद्योजक लॉबीनेही आता तिल्लारी जंगलातील खाजगी डोंगर ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. जंगल तोडून तिथे मोठ्या प्रमाणात रबराची लागवड सुरु आहे. कागदावर पेन्सिलने झाडांचे चित्र काढावे आणि मधूनच काही भाग रबराने खोडून टाकावा, असं काहीसं चित्र काही भागात दिसतं आहे.
अप्रतिम निसर्गसौंदर्य, विपुल वन्यजीवन आणि फुलपाखरु, पक्ष्यांच्या वैविध्याने अशा या तिल्लारी जंगलाला पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी अलीकडील काही वर्षात तरुण पिढी पुढे आली आहे. निसर्ग अभ्यासक
Raman Kulkarni
Faruk Mhetar
, प्रशांत जाधव, Pravin Desai
ही मंडळी नवनवीन उपक्रम राबवत आहेत. नेचर कॅम्पच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱयातील छायाचित्रकरांना ते दोडामार्गमधील जंगल वैभव दाखवत आहेत. पर्यटनातून लोकांना रोजगार उपलब्ध झाल्यास ते स्वतः पुढे येऊन जंगल वाचवतील यासाठी तरुण निसर्ग अभ्यासकांचे प्रयत्न सुरु आहेत.
Comments
Post a Comment