वाघांची लढाई अस्तित्वासाठी
हद्द प्रस्थापित करण्यासाठी आक्रमक झालेल्या नर
वाघांपासून पिल्लांचे संरक्षण करण्यासाठी माया वाघिणीने काही दिवसांपूर्वी
या वाघांबरोबर मिलन करण्याचा पर्याय स्वीकारला. अवघ्या दीड वर्षांच्या
पिल्लांना मातृत्वाची गरज असताना मायाचे नैसर्गिक नियम बाजूला ठेवून मीलनास
तयार होणे, ही वन्यजीव अभ्यासक आणि वनाधिकाऱ्यांच्या दृष्टीकोनातून धक्कादायक
घटना आहे. चोहोबाजूने घेरलेल्या ‘व्याघ्र बेटां’मध्ये सुरू असलेल्या
अस्तित्वाच्या लढाईचे हे बोलके उदाहरण आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील माया ही
सर्वांची लाडकी वाघीण. या जंगलातील पर्यटन वाढविण्यात उल्लेखनीय वाटा
असलेल्या मोजक्या वाघांमधील लोकप्रिय वाघीण म्हणून माया ओळखली जाते.
रस्त्यावरून पिल्लावळ घेऊन मनमुराद भटकंती करणारी ही माया वन्यजीव
छायाचित्रकारांची फोटो काढण्याची हौस पूर्ण भागवते. त्यामुळे
वनाधिकाऱ्यांबरोबरच नियमित येणाऱ्या निसर्गप्रेमींचा तिच्यावर विशेष जीव
आहे. पण काही दिवसांपूर्वी मायाने या सगळ्यांना एक धक्का दिला. तिची पिल्ले
अवघी दीड वर्षांची असून, स्वावलंबी झालेली नाहीत तरी देखील ती एकदा गब्बर
आणि काही दिवसातच मटकासूर या दोन वाघांबरोबर मीलन करताना वन्यप्राणी
अभ्यासकांना दिसली. या घटनेचे फोटोही वन्यजीव छायाचित्रकारांना मिळाले
आहेत. पिल्ले लहान असताना मायाने घेतलेला हा निर्णय सगळ्यांसाठीच अनपेक्षित
ठरला आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत याच जंगलात वास्तव्यास
असलेल्या माधुरी वाघिणीची माया ही मुलगी. पिल्लू असल्यापासूनच तिच्या शांत
आणि मनमुराद फिरण्याच्या सवयीमुळे ती पर्यटक आणि वनाधिकाऱ्यांच्या चर्चेत
राहिली आहे. अनेक पर्यटकांना मायाचे दर्शन झाल्याशिवाय जंगल सफारी पूर्ण
झाल्यासारखे वाटत नाही. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ती तिचे दोन नर आणि
एक मादी पिल्लू घेऊन पाढंरपोळी या तिच्या हद्दीत फिरताना दिसत होती. मात्र
हद्द प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ताकदवान मटकासूर या वाघाने
तिच्या नर पिल्लावर काही दिवसांपूर्वी हल्ला केला. हा वाघ मायाबरोबर
मिलनास इच्छुक होता. याच काळात गब्बर आणि मटकासूर यांनीही हद्दीच्या वादात
भांडणे झाली होती. धक्कादायक बाब म्हणजे मायाने पिल्लांना वाचविण्यासाठी
काही दिवसांपूर्वी मटासूरबरोबर मीलनाचा पर्याय स्वीकाराला. एवढेच नव्हे तर
दहा दिवसांपूर्वी तिने गब्बर या वाघाबरोबर मीलन केले. या काळात तिने
पिल्लांना दूर ठेवले होते.
साधारणतः वाघीण दोन ते अडीच वर्षांपर्यंत
पिल्लांचे संगोपन करते. पुढे टप्प्याट्प्याने पिल्ले शिकारीचा प्रयत्न
करतात. मायाचेही तिच्या पिल्लांवर खूप प्रेम असून ती सतत तिच्यापुढे मागे
घुटमळत असतात. गेल्या महिनाभरात तिनेही पिल्लांना शिकारीचे प्रशिक्षण
देण्यास सुरुवात केली होती. त्यांनी लहान हरिण, भेकराची शिकार केली असली
तरी ती अजून स्वावलंबी झालेली नाही. पिल्ले लहान असतानाही मायाने पुन्हा
मीलनास तयार होणे, हे केवळ पिल्लांप्रती असलेल्या असुरक्षिततेच्या भावनेतून
घेतलेला निर्णय असावा. जगण्याच्या लढाईत टिकण्यासाठी वन्यजीवांच्या
आयुष्यात असे आश्चर्यकारक बदल घडत असतात. मायाच्या हालचालींवर आपले बारीक
लक्ष असल्यामुळे ही बाब निदर्शनास आली, असा खुलासा ताडोबा व्याघ्र
प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक जी. पी. गरड यांनी केला आहे. या निमित्ताने
वाघांच्या बदललेल्या जीवनचक्राचे सखोल अभ्यास झाला पाहिजे, अशी गरजही
त्यांनी बोलून दाखविली आहे.
या घटनेबदद्ल वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ
इंडियातील शास्त्रज्ञ बिलाल हबीब यांनीही आश्चर्य व्यक्त केले असून, ज्या
ठिकाणी वाघांची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी असे प्रकार घडू शकतात.
पिल्लांना या वाघांपासून वाचविण्यासाठी ती तिने हा पर्याय निवडला असणार.
यामुळे हे वाघ तिच्या पिल्लांवर हल्ला करणार नाहीत, असा तिचा उद्देश असू
शकतो, अशी शक्यता त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. कान्हामध्येही
काही वाघिणींच्या बाबतीत
हाच प्रकार घडला आहे. हद्दीचे वाद, कुटुंबातील
बहीण-भावडांमध्ये होत असलेले मीलन, व्याघ्र प्रकल्पांच्या बाहेर वाढत
असलेला वावर... या आणि अशा वाघांमध्ये होत असलेल्या या बदलांबद्दल अभ्यासक
आणि वनाधिकाऱ्यांमध्ये मतभेद असून प्रत्येक जण स्वतःचे अर्थ काढत आहेत.
मायाने घेतलेला निर्णयही चुकीचा की बरोबर, याचा अभ्यास संशोधक करतीलच पण या
निमित्ताने व्याघ्र प्रकल्पाच्या मर्यादीत जागेतील वाघांची वाढलेली
संख्या, जगण्यासाठी सुरू असलेल्या स्पर्धेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
काही महिन्यांपूर्वीच ‘ग्लोबल टायगर फोरम’ने
व्याघ्र संवर्धनात भारत पुढे असून येथील वाघांच्या संख्येत उल्लेखनीय वाढ
झाले असल्याचे व्याघ्र संवर्धन परिषदेत जाहीर केले. पण वाढलेल्या या
संख्येतून अनेक नवीन समस्या निर्माण होत असल्याचे माया हे उत्तम उदाहरण
आहे. वाढलेली संख्या हे आता वाघांच्या अस्तित्वासाठी नवीन आव्हान बनले आहे.
देशातील बहुतांश व्याघ्र प्रकल्पांना सध्या बेटांचे स्वरूप आले आहे.
चोहोबाजूंनी मानवी वस्ती आणि जंगलातील मर्यादित फिरण्याचे बंदिस्त
स्वातंत्र्यामुळे वाघांची वाढ खुंटते आहे. निसर्गनियमानुसार प्रत्येक वाघ
स्वतःची हद्द (टेरिटरी) निश्चित करीत असतो. जागा निश्चित झाल्यानंतर इतर
वाघांना त्या हद्दीत प्रवेश मिळत नाही. एखाद्याने घुसखोरी केलीच, तर
मारामारी होऊन ताकदवान वाघ त्या हद्दीचा मालक बनतो. सध्या व्याघ्र प्रकल्प
नावाच्या बेटांमध्ये राहणाऱ्या या वाघांच्या या मोकळे फिरवण्यावर मर्यादा
आल्या आहेत. त्यामुळे नवीन जागेच्या शोधात व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरील
वनक्षेत्रातही (बफर झोन) वाघ आता वावरताना दिसतात. प्रजननासाठी जोडीदार
शोधतानाही त्यांच्यामध्ये संघर्ष होत आहेत. दुदैर्वाने एकाच कुटुंबातील नर
आणि मादींचे मीलन होत असल्याने पिल्लांच्या वाढीवरही त्याचे दुष्परिणाम होत
आहेत. वाघांमधील अतंर्गत संघर्ष आणि मनुष्यबरोबर सुरू असलेला संघर्ष यावर
मार्ग काढण्यासाठी यापुढे वेगाने पावले उचलण्याची गरज आहे. व्याघ्र
प्रकल्पांना जोडणारे कॉरिडॉर प्रत्यक्षात दिसण्यासाठी तातडीने निर्णय घेतले
पाहिजेत. याच वेळी वाघांच्या स्थलांतराचे प्रयोग यशस्वी कसे होतील, याचा
विचार झाला पाहिजे.
चंद्रपूरमध्ये देखील वाघांची वाढती संख्या हे
वनाधिकाऱ्यांसाठी आव्हान झाले आहे. व्याघ्र प्रकल्पापेक्षा जास्त वाघ सध्या
बाहेरील बाजूस दिसत आहेत. ताडोबा अभयारण्य आणि परिसारत शंभर वाघ असून
चंद्रपूरमधील वृक्षाच्छादित प्रदेशातही त्यांचा वावर आहे. जैववैविध्याने
समृद्ध असलेल्या ब्रम्हपुरीमध्येदेखील ३४ पेक्षा जास्त वाघ वास्तव्यास
आहेत. हद्द प्रस्थापित करण्यासाठी वाघ इतर जंगलांमध्ये जात आहेत. यवतमाळ
जिल्ह्यातील वाघ मध्यप्रदेशमधील पेंच व्याघ्र प्रकल्पा आणि आंध्र
प्रदेशमध्येही गेल्याचे प्रकार घडले आहेत. वाघांना सुरक्षित अधिवास निर्माण
करून देण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेर
वास्तव्यास असलेल्या वाघांचे रिलोकेशन अर्थात स्थलांतरासाठी आता वन
विभागाने हालचाली सुरू झाल्या आहेत.
दोन वाघांचे या पूर्वीच रेडिओ कॉलर
बसवून स्थलांतर केले आहे. याशिवाय अजून काही वाघांना इतर व्याघ्र
प्रकल्पांमध्ये पाठविण्यात येणार आहे. राजस्थानमधील रणथंबोर नॅशनल पार्क
मधील वाघ २००८ मध्ये सरिस्का व्याघ्र प्रकल्पामध्ये हलविण्यात आले होते.
मध्यप्रदेशमधील कान्हा आणि बांधवगड व्याघ्र प्रकल्पातूनही पन्ना नॅशनल
पार्कमध्ये वाघांचे स्थलांतर केले होते. यातील सरिस्काचा प्रयोग अयशस्वी
ठरला असला तरी पन्नाचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. पन्नामध्ये सध्या २३ वाघ
असून ११ पिल्लांचीही नोंद झाली आहे. वाघांचे स्थलांतर हा त्यांच्या
संवर्धनासाठी महत्त्वाचे पाऊल ठरते आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने
या स्थलांतर केलेल्या वाघांवर चोवीस तास नजर राहणार असेल तर हा प्रयोग
नक्कीच आपल्याबरोबर वाघांचे अस्तित्व असलेल्या इतर देशांसाठी देखील
मार्गदर्शक ठरू शकतो. मात्र यासाठी वन विभागाच्या प्रबळ इच्छाशक्तीचा जोड
हवी आहे. वाघांच्या संवर्धनामध्ये उल्लेखनीय कार्य केलेले वनाधिकारी
वाघांच्या स्थलांतराची मोहीम यशस्वी करतील एवढीच अपेक्षा.(मायाची वरील सर्व छायाचित्रे - किरण घाडगे यांनी टिपलेली आहेत.)
चैत्राली चांदोरकर
Comments
Post a Comment