पॅरिस अनुभवताना...
सांस्कृतिक माहेरघर असलेल्या पुण्याचा अभिमान बाळगून
पॅरिसमध्ये मी प्रवेश केला; पण ऐतिहासिक वास्तू, संस्कृती, परंपरा...
याविषयी आत्मीयता असणे म्हणजे काय, याचा नेमका अर्थ मला तिथे उलगडला.
पॅरिसमधील लोक आपल्या शहरावर प्रचंड प्रेम करतात आणि तेथील सौंदर्य टिकवून
ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतात.
तापमानवाढीच्या दुष्परिणामांना रोखण्याबाबत कायदेशीर
कटिबद्धता दर्शविण्यासाठी जगातील १९० देशांचे धोरणकर्ते दोन आठवडे
पॅरिसमध्ये जमले होते. हवामानबदलाच्या या परिषदेला उपस्थित राहण्याच्या
निमित्ताने पॅरिस या सुंदर शहराची हवा अनुभवयाला मिळाली. पर्यटकांची
सर्वाधिक पसंती असलेल्या पहिल्या पाचातील या शहरातील मुक्काम सुखद तर
ठरलाच; पण त्याच्याही पलीकडे जाऊन खूप काही शिकवणारा ठरला. आपल्या शहरावरील
प्रेम केवळ बोलून न दाखविता कृतीतून दाखविण्यापासून ऐतिहासिक परंपरा
जपण्यापर्यंतचे अनेक धडे या शहराने दिले. त्यामुळे पॅरिस थेट हृदयात जाऊन
बसले आहे.
परिषदेचे ठिकाण आणि मी राहत असलेले होस्टेल यांच्यात
चांगलेच अंतर असल्याने मध्यवर्ती शहरातून वाट काढत परिषदेला जावे लागे.
याचा फायदा म्हणजे गाडीत बसल्यावर दररोज मला सार्वजनिक पॅरिस बघायला मिळत
होते. परिषद सुरू होण्याच्या काही दिवस आधीच पॅरिसमध्ये मोठा दहशतवादी
हल्ला झाला होता. त्याचे सावट परिषदेवर होते. विमानतळावर उतरणारा प्रत्येक
प्रतिनिधीच्या चेहऱ्यावर याबाबतची चिंता दिसत होती. मात्र, त्या सर्वांना
पॅरिसने जिंकले. ‘या शहरात तुम्ही सुरक्षित असून तुमच्या आदरातिथ्यासाठी
संपूर्ण पॅरिस सज्ज झाले आहे,’ असे वातावरण तेथील नागरिकांनी निर्माण केले
होते. त्यामुळे शहरात कोठेही एकटे फिरताना असुरक्षिततेची जाणीव झाली नाही.
****
कोणत्याही देशातील, राज्यातील शहर जवळून अनुभवायचे
असल्यास तेथील सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करायला हवा. या प्रवासात
तुम्हाला तेथील नागरिक, देहबोली, जीवनशैली, त्यांच्यामध्ये असलेली सामाजिक
बांधिलकी, सार्वजनिक आयुष्य असे विविध पैलू उलगडतात. शहराचे खरे चित्र समोर
येते. पॅरिसला जाण्यापूर्वी मी वेबसाइटवर तेथील सार्वजनिक वाहतुकीची
माहिती घेतली होती. परिषदेसाठी पॅरिसबद्दल सविस्तर माहिती देणारी वेबसाइट
तयार केली होती. ती चाळताना वाहतुकीचे नियोजन या पानावरील एका वाक्याने मला
सुखद धक्काच दिला. गेल्या दहा वर्षांपासून पुण्यात दुचाकीवर प्रवास
करणाऱ्या व्यक्तीसाठी ते वाक्य स्वप्नवतच होते. ‘पॅरिसमध्ये दाखल झाल्यावर
सार्वजनिक वाहनांनी प्रवास करा, आमची सार्वजनिक वाहने पर्यटकांना कोठेही
फिरविण्यास सक्षम आणि सुरक्षित असल्याचा आम्हाला अभिमान आहे,’ अशा दावा
त्यांनी केला होता. प्रत्यक्षात शहरात फिरतानाही मला हाच अनुभव मिळाला.
मध्यवर्ती शहरापासून ते दूरवर पसरलेल्या उपनगरांपर्यंतचा परिसर मेट्रो आणि
आरईआरचे (लांब पल्ल्याच्या ट्रेन) जाळे पॅरिसभर आहे. शहराच्या कितीही लांब
अंतराच्या ठिकाणी एक तासाच्या आत तुम्ही ट्रेनमधून निवांत पोहोचू शकता. तीन
ते चार मिनिटांपेक्षा जास्त वेळ ट्रेनची वाट पाहावी लागत नाही. काही ट्रेन
तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चालतात. सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयाच्या
वेळांमध्ये ट्रेनमधून फिरताना गर्दी पाहिली की मुंबईच्या लोकलची आठवण येते.
मात्र, पॅरिसमधील ट्रेन स्वच्छ असून त्यांना दरवाजे आहेत. जमिनीखालच्या
तीन ते चार मजल्यांपर्यंत विणलेल्या मेट्रोच्या जाळ्याबरोबरच शहरातील गल्ली
बोळांमध्ये जाणाऱ्या बसचे जाळेही उल्लेखनीय आहे. याशिवाय मोनोरेलचा पर्याय
उपलब्ध आहे. या सक्षम सार्वजनिक वाहतुकीमुळे सर्व वर्गांतील नागरिक या
वाहनांतूनच प्रवास करतात. विशेष म्हणजे कोणत्याही वाहनाने प्रवास
करण्यासाठी एकच तिकीट वापरता याते. शहरातील खासगी गाड्यांची संख्या
मर्यादित ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने ड्रायव्हिंग लायन्स देण्यावर अनेक
कठोर बंधने घातली आहेत. लायसन्स मिळविणे ही अवघड प्रक्रिया असून
वाहतुकीच्या नियमांची काटेकोरपण तपासणी होते. एवढा त्रास ओढवून
घेण्यापेक्षा सार्वजनिक वाहनेच परवडली, अशी येथील लोकांची मानसिकता आहे.
****
पॅरिसमध्ये बसने आणि चालत फिरताना खूप आल्हाददायी आणि
तेथील माणसे स्वच्छंदी असल्याचे जाणवते. आखीव रेखीव रस्ते हीच या शहराची
ओळख आहे. शिस्तबद्द वाहने, रस्त्यांच्या दुतर्फा लावलेली सुटसुटीत झाडे आणि
आकर्षक सजावटीने खुणवणारी दुकाने पाहाताना आपण किती चालत आहोत, याचे भान
राहत नाही. संध्याकाळी हे रस्ते अधिकच खुलतात. गल्लोगल्ली असलेल्या
कॅफेमध्ये तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध गटांचे गप्पांमध्ये
रंगलेले अड्डे पाहताना छान वाटते. या कॅफेमध्ये तुम्ही कितीही वेळ बसला तरी
तुम्हाला उठवले जात नाही. त्यामुळे कॉलेजवयीन मुले या कॅफेमध्ये बसून
विविध वाद्य वाजविण्याचा आनंद लुटतात. हे कॅफे आणि दुकानांमध्ये फिरताना
वेगवेगळ्या सुगंधांनी, अरोमांनी नकळत चैतन्य निर्माण होते. हे शहरच सुगंधी
आहे, असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.
शॉ एलिझे हा या शहरातील सर्वात राजेशाही रस्ता. त्याच्या
दुतर्फा चेस्टनट वृक्ष, मोठे मॉल, ब्रँडेड वस्तूंची दुकाने, रेस्टॉरंट्स
बघत संध्याकाळी या रस्त्यावर फिरण्याची मजा काही औरच आहे. अनेक लोक खास
विंडो शॉपिंगसाठी येथे येतात. या रस्त्याच्या एका बाजूला नेपोलियन
बोनापार्टने उभारलेली आर्क द ट्रिऑन्फ आहे. या कमानीवर पर्यटकांना जाण्यास
परवानगी आहे. या कमानीतून लांबवर गेलेले बारा रस्ते उंचावरून बघण्याची संधी
मिळते.
पॅरिस शहराचा ऐतिहासिक वारसा समृद्ध आहे. फ्रान्सच्या
उत्तरेकडील मैदानी प्रदेशातल्या सीन नदीच्या पात्रातील ‘इल दा सीने’ या
बेटापासून या शहराच्या विकासाला सुरवात झाली. त्यावेळी तेथील लोक मासेमारी
करून या भागात राहत होते, पुढे या नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर या शहराचा
विकास नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर झाला. पॅरिसला सुनियोजित शहर बनविण्यात
नेपोलियन बोनापार्टचा मोठा वाटा आहे, असे सांगितले जाते. या शहराची
निर्मिती करतानाच, शहराचा ऐतिहासिक वारसा आणि सौंदर्य टिकविण्यावर विशेष भर
देण्यात आला आहे. त्यामुळे स्मारके, कारंजी, नदीच्या दुतर्फा उभारलेल्या
दिसणाऱ्या जुन्या इमारतींमुळे या शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. तब्बल
दोन हजार वर्षांचा उल्लेखनीय इतिहास असलेल्या या शहरातील नागरिक कलासक्त
आहेत. आपला इतिहास, निसर्ग सौंदर्य, जीवनशैली, संस्कृती, परंपरा यांचा
त्यांना प्रचंड अभिमान आहे. त्यामुळे ही संस्कृती टिकविण्यासाठी ते मेहनत
घेतात. कलेविषयी असलेल्या आत्मीयतेमुळे ही मंडळी दर्दी आहेत. त्यामुळेच या
शहरात फिरताना आपल्याला प्रेक्षणिय स्थळांचा जणू खजिनाच समोर येतो. आयफेल
टॉवरचा मनोरा, लुव्रचे मनोहारी कलासंग्रहालय, जुनी चर्च, भव्य पुतळे, सीन
नदीचा किनारा, जिथे पाहावे तिथे अनोखे विश्व उलगडत जाते.
****
पॅरिस म्हटले, की आयफेल टॉवर डोळ्यांसमोर येते. जगातील
सात आश्चर्यांपैकी एक असलेले आयफेल टॉवर प्रत्येकाचेच आकर्षण ठरते. तीनशे
मीटर उंच आणि एकशे एक मीटरचा व्यास असलेल्या हा टॉवर १८८९ साकारला गेला.
अलेक्झांडर गुस्तावे या इंजिनिअरने त्या काळात त्याची रचना केली. टॉवरच्या
सर्वात उंच ठिकाणी पोहोचल्यावर टॉवर उभारणाऱ्या टीमच्या प्रतिकृती आणि
इतिहास मांडण्यात आला आहे. आयफेल टॉवरच्या वरच्या मजल्यावर शहर पाहताना
डोळ्याचे पारणे फिटतात. नजर पोहोचते तिथेपर्यंत विस्तारलेले शहर बघण्याचा
अनुभव शब्दात सांगता येत नाही. संध्याकाळी आयफेल टॉवरचे दृश्यच बदलते.
आकर्षणक रोषणाईने सजलेला हा टॉवर बघताना नजर खिळून राहते. लोक तास न् तास
या परिसरात घुटमळत राहातात. डोळ्यांनी अनुभवलेला दिव्य टॉवरचे सौंदर्य
कॅमेऱ्यात टिपण्यासाठी शेकडो लोक प्रयत्न करीत असतात; पण प्रत्यक्ष दिसणारा
टॉवर छायाचित्रात आल्याचे समाधान आपल्याला मिळत नाही.
****
पॅरिसमधील अजून एक आकर्षण म्हणजे तेथील लुव्र संग्रहालय.
हे संपूर्ण संग्रहालय कोणताही पर्यटक एक दिवसात बघू शकत नाही. म्युझियम
समजून घेण्यासाठी किमान एक महिना तरी वेळ काढला पाहिजे, असे मत कलेची उत्तम
जाण असणाऱ्यांचे आहे. लिओनार्दो-दा-विंची याने चितारलेले मोनालिसा
चित्राचे आकर्षण तर सर्वांनाच. त्यामुळे संग्रहालयाच्या प्रवेशद्वारात
त्याचा नकाशा मिळाल्यावर पर्यटक लगेलच मोनालिसाचा शोध घेतात. या संपूर्ण
संग्रहालयामध्ये फोटो काढण्यास परवानगी असल्याने पर्यटक मुक्तपणे फोटो काढत
फिरतात. अर्थातच मोनालिसाच्या चित्राजवळ फोटो काढण्यासाठी खूप गर्दी असते.
गेल्या काही वर्षांत सेल्फी विथ मोनालिसाची क्रेझ वाढली आहे. लुव्र
संग्रहालयात प्रवेश करताना महाकाय पिरॅमिड पर्यटकांचे स्वागत करतो. लुव्र
संग्रहालय फ्रेंच राज्यक्रांतीपूर्वी राजाचा राजवाडा होते. विविध राजांनी
त्यांच्या व्यक्तिगत संग्रहासाठी जगभरात फिरताना मिळालेल्या कलात्मक वस्तू
गोळा केल्या होत्या. नंतर या राजवाड्यामद्ये कलासंग्रहालय साकारण्यात आले.
साधारणतः सतराव्या शतकाच्या अखेरीस हे संग्रहालय लोकांसाठी खुले झाले. येथे
तब्बल ३० लाख कलात्मक वस्तू आहेत. याशिवाय पाच हजारांहून अधिक मौल्यवान
चीजवस्तूंचा आणि पाच हजारांहून अधिक महत्त्वपूर्ण शिल्पांचा समावेश आहे.
रोमन, ग्रीक आणि प्राचीन इजिप्तमधील पुरातन चित्र-शिल्पांपासून एकोणिसाव्या
शकतातील मॉनेट, देगा, रेनॉयर आदींच्या कलाकृतींपर्यंत एकाहून एक सरस
गोष्टी या संग्रहालयात पाहायला मिळतात.
****
पॅरिसच्या नागरिकांसाठी चीज हा खाद्यपदार्थ जगण्याचा
अविभाज्य घटक आहे. दिवसभरातील कोणतेही जेवण, न्याहारी असली तरी चीज शिवाय
पूर्ण होत नाही. पॅरिसमध्ये बेकऱ्यांमध्ये चीजचे असंख्य प्रकार बघायला
मिळतात. एका दुकानात सहज चौकशी केली, तर तेथील विक्रेत्याने त्यांच्याकडे
साडे चारशे प्रकारचे चीज उपलब्ध असल्याचे सांगितले. संपूर्ण फ्रान्समध्ये
बाराशेहून अधिक प्रकारचे चीज मिळतात. अर्थात यातील बहुतांश प्रकारचे चीज हे
मांसाहारी प्रकारात मोडतात आणि त्यांचा वासही काहीसा उग्र असतो. केवळ चीजच
नव्हे; पण एकूणच शाहाकाही लोकांना पॅरिसमध्ये ब्रेडचे पदार्थ आणि सॅलड या
व्यतिरिक्त काहीही उपलब्ध नाही.
****
पॅरिसमधील गार्द नार्द हा परिसर भारतीयांना सुखद अनुभव
देऊन जातो. मेट्रोने या स्टेशनला उतरून रस्त्यावर आल्यावर आपण नक्की कुठे
आलो आहोत, असाच प्रश्न पडतो. कारण समोर सगळी भारतीय नावाची हॉटेल तुमचे
स्वागत करतात. मद्रास कॅफे, सरवाना भुवन यांसह भारतातील काही प्रसिद्ध
हॉटेलच्या शाखा या परिसरामध्ये आहेत. या शिवाय भारतीय मंडळींचे हक्काचे
किराणा सामान, भाजीपाला सगळे काही या परिसरामध्ये उपलब्ध आहे. या रोडवर
दिवसभर भारतीय चेहेऱ्यांची वर्दळ बघायला मिळते. सुट्टीच्या दिवशी लोक
पंजाबी डिश, डोसा-उत्तप्पा, थाळी खाण्यासाठी आवर्जून तेथील हॉटेलमध्ये
हजेरी लावतात. अनेक फ्रेंच लोकही हटके खाण्यासाठी या हॉटेलमध्ये येतात.
एकूणच काय तर पॅरिस बद्दल किती लिहिले तरी कमीच. पॅरिस अनुभवण्यातील मजा काही औरच.
.................................
Comments
Post a Comment