खवलोत्सव खवले मांजराच्या नावाने चांगभलं म्हणत डूगवे ग्रामस्थांनी खवले मांजराला पालखीत घालून नाचविले, वेळ होती डूगवेतील खवलोत्सवाची. पालखी घराघरात फिरली, ग्रामस्थांनी भक्तिभावाने खवलेमांजराचे औक्षण केले. पालखी परत सहाणेवर बसली, तेथे खेळे/ नमन सदर करण्यात आले, त्यात खवल्याचे सोंगसुद्धा आले. कार्यक्रमाच्या शेवटी समस्त डूगवे ग्रामस्थ, सह्याद्री निसर्ग मित्रचे कार्यकर्ते, वनविभाग, पोलीस या सर्वांच्या वतीने ग्रामदेवतेला साकडे घालण्यात आले. बा गावदेवी आमच्या गावात खवलेमांजर आहे त्याचे रक्षण कर,त्यांची संख्या वाढव, तसेच तस्करी चोरता व्यापार यात अडकलेल्या लोकांना चांगली बुद्धी दे. जगातील सर्व खवले मांजर प्रजातीचे रक्षण कर असे गाऱ्हाणे घालण्यात आले. तसेच त्यावेळी सर्व ग्रामस्थांनी खवले मांजराच्या रक्षणाची शपथ घेतली. शेवटी महाप्रसाद होऊन कार्यक्रम संपन्न झाला. कोकणात सध्या खवलेमांजर या प्राण्याच्या चोरट्या शिकारीचे प्रमाण वाढले असून वेळोवेळी त्याच्या तस्करीच्या घटना उघडकीस येत आहेत , असे असतानाच चिपळूण तालुक्यातील डूगवे गावातील ग्रामस्थ मात्र या प्राण...