पॅरिस अनुभवताना... सांस्कृतिक माहेरघर असलेल्या पुण्याचा अभिमान बाळगून पॅरिसमध्ये मी प्रवेश केला; पण ऐतिहासिक वास्तू, संस्कृती, परंपरा... याविषयी आत्मीयता असणे म्हणजे काय, याचा नेमका अर्थ मला तिथे उलगडला. पॅरिसमधील लोक आपल्या शहरावर प्रचंड प्रेम करतात आणि तेथील सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतात. तापमानवाढीच्या दुष्परिणामांना रोखण्याबाबत कायदेशीर कटिबद्धता दर्शविण्यासाठी जगातील १९० देशांचे धोरणकर्ते दोन आठवडे पॅरिसमध्ये जमले होते. हवामानबदलाच्या या परिषदेला उपस्थित राहण्याच्या निमित्ताने पॅरिस या सुंदर शहराची हवा अनुभवयाला मिळाली. पर्यटकांची सर्वाधिक पसंती असलेल्या पहिल्या पाचातील या शहरातील मुक्काम सुखद तर ठरलाच; पण त्याच्याही पलीकडे जाऊन खूप काही शिकवणारा ठरला. आपल्या शहरावरील प्रेम केवळ बोलून न दाखविता कृतीतून दाखविण्यापासून ऐतिहासिक परंपरा जपण्यापर्यंतचे अनेक धडे या शहराने दिले. त्यामुळे पॅरिस थेट हृदयात जाऊन बसले आहे. परिषदेचे ठिकाण आणि मी राहत असलेले होस्टेल यांच्यात चांगलेच अंतर असल्याने मध्यवर्ती शहरात...